प्रभागरचना , आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
कऱ्हाड - राज्यातील डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे 195 नगरपालिका , तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. या निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर झाला . त्यामध्ये 24 जूनपर्यंत मुख्याधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे , तर 27 जुलैपर्यंत सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत मुख्याधिकाऱ्यांनी काढण्याचे त्यात निर्देश आहेत. 16 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल .
राज्यातील सुमारे 195 नगरपालिका , नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रभाग रचना , आरक्षण सोडती केव्हा होणार , याकडे इच्छुकांसह लक्ष लागून होते . राज्य निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडतीसह प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला . त्यामुळे पालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे स्पष्ट झाले . प्रशासकीय पातळीवर सध्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचे काम गतिमान होईल . या कार्यक्रमानुसार मुख्याधिकाऱ्यांकडून 24 जूनपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होईल . 29 जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या प्रस्तावास मान्यता मिळून जिल्हाधिकारी 30 जूनला सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीसाठी नोटीस प्रसिद्ध करतील . त्यानुसार संबंधित मुख्याधिकारी दोन जुलैपर्यंत नगरपालिका , नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढतील . प्रारूप प्रभाग रचना , प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची नागरिकांच्या माहितीसाठी , तसेच हरकती व सूचना मागवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाच जुलैला वृत्तपत्र व वेबसाईटवर प्रसिद्ध होईल . त्यावर पाच ते 14 जुलै हा हरकती व सूचनांसाठीचा कालावधी राहील. त्यावर दाखल होणाऱ्या हरकती व सूचनांवर 27 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील . 10 ऑगस्टपर्यंत संबंधित विभागीय आयुक्तांकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता मिळेल. त्यानंतर 16 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल .♍
No comments:
Post a Comment